Monday 12 December 2011

ऑडी हो तो रवि शास्‍त्री की ... !


     विंडीजचा सफाया करुन भारतीय क्रिकेट संघाने आता ऑस्‍ट्रेलिया दौ-याची वाट धरलीय. अर्धा संघ ऑस्‍ट्रेलियात दाखल देखील झालेला आहे. ऑस्‍ट्रेलिया दौरा असो की न्‍यूझीलंडचा दौरा पहाटे उठून थंडीत शाल लपेटून मॅच टिव्‍हीवर बघण्‍याची मजा असते.
    ऑस्‍ट्रेलिया संघाविरुध्‍द होणारे सामने म्‍हणजे प्रेस रिपोर्टींग करण्‍यास सर्वात उत्‍तम सामने असं आम्‍ही मानतो. याला कारण सामना दुपारपूर्वी संपायचा. त्‍यामुळे पहिल्‍या आवृत्‍तीपासून संपूर्ण बातमी कॅरी करता येते. द.आफ्रिका आणि विंडीज अथवा इंग्‍लंडविरुध्‍द सामना असेल तर पहिल्‍या आवृत्‍तीला बातमी अर्धवट आणि विंडीजच्‍या सामन्‍यात तर सिटीलाही अर्धवट.
                                                 VIDEO सौजन्य youtube
     रात्री अर्धवट झोप झाल्‍यावर पेंगलेल्‍या अवस्‍थेत चार दिवस शेडयूल बिघडावं तसं हे बातमीचं समीकरण बिघडलेलं रहातं म्‍हणून ऑस्‍ट्रेलिया दौरा आवडीचा. अर्थात ही आवड कॉलेजपासूनची याला कारण पूर्ण कव्‍हरेज बघता यायचं.
     टिव्‍हीवर मॅच बघणं म्‍हणजे कसा मोठा सोहळा. वडील आधी जागे व्‍हायचे. त्‍यांनाही क्रिकेटची प्रचंड आवड. सकाळपर्यंत कधी त्‍यांनी तर कधी मी चहा करायचा अन् त्‍याकाळी असणा-या कृष्‍णधवल अर्थात ब्‍लॅक and व्‍हाईट सोनीच्‍या टिव्‍हीवर मॅच बघायची पुढे रंगीत टिव्‍ही घरात आल्‍यावर या मॅचची रंगत खूपच वाढली. 
     त्या काळातलं चॅनेल नाईनचे दर्जेदार प्रक्षेपण आणि तो रिची बेनॉचा आवाज आजही कानात ताजा आहे. ते फुरसतीत बघितलेले सामने आजही आठवणीचा मोठा  भाग बनून आहेत. त्‍या काळात बापलेकाचा शब्‍दविना होणारं प्रेमळ संवाद कृतीतून व्‍यक्‍त  व्‍हायचा.
     रवि शास्‍त्रीची ऑडी कायम स्‍मरणात अशीच राहिलीय. कोण कौतुक होतं त्‍या ऑडीचं त्‍यावेळी आता भारतीय रस्‍त्‍यावर ही गाडी सहजपणे दिसते पण ऑडी हो तो रवि शास्‍त्री की हेच खरं.
    क्रिकेटची ती दुनियाच खरोखर मोहमयी आहे. या निमित्‍तानं सचिन तेंडूलकर, अजय जडेजा, किरण मोरे, विनोद कांबळी एक ना अनेक अशा खेळाडूंशी बोलण्‍याचा, मुलाखती घेण्‍याचा योग आला पण घरात बसून टिव्‍हीवरच्‍या मॅचचा आनंद कधी मैदानावर नाही आला. ऑस्‍ट्रेलिया दौ-याच्‍या निमित्‍तानं सारं आठवलं आता वाट 26 डिसेंबरची.     
-         पॅसिफिक

No comments:

Post a Comment